मुंबई- पुलवामा हल्ल्याचे थेट प्रतिसाद आता क्रिकेटमध्येही उमटू लागले आहेत. हल्ल्याचा क्रिकेट जगतातून तीव्र निषेध केला जात आहे. भारतात पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो झाकले जात आहेत. आता, पाकिस्तान सुपर लीगची अधिकृत प्रसारण कंपनी रिलायन्स आयएमजीने माघार घेतली आहे. लीगचे थेट प्रसारण करणाऱ्या आयएमजी रिलायन्सने पीसीबीला ई-मेल करत याची माहिती दिली आहे.
पुलवामा हल्ला : पाकिस्तान सुपर लीगचे भारतातील प्रसारण बंद - पीसीबी
आयएमजी रिलायन्सने पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू शकत नाही, असे म्हटले आहे.
आयएमजी रिलायन्सने सांगितले, आम्ही रविवारी पाकिस्तान सुपर लीगचे प्रोडक्शन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती आम्ही पीसीबीला दिली आहे. आयएमजी रिलायन्स पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू शकत नाही.
पीसीबीचे डायरेक्टर वसीम खान म्हणाले, आम्ही लवकरच नवीन सहयोगी कंपनीचे नाव जाहीर करू. या घटनेमुळे आम्ही निराश आहोत. आमच्या मतानुसार, खेळ आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेग-वेगळ्या ठेवल्या पाहिजेत. भारतात पाकिस्तान सुपर लीगचे थेट प्रसारण करणाऱ्या डी स्पोर्टसने यावर्षी प्रसारण न करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग २ वर्ष इंटरनेटवर प्रसारण झाल्यानंतर गेल्यावर्षी डी स्पोर्टसने लीगचे अधिकृतरित्या थेट प्रक्षेपण केले होते.