नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एकदिवसीय विश्वकरंडकानंतर क्रिकेटपासून लांब आहे. तो निवृत्ती घेणार की कमबॅक करणार, यावर चर्चा सुरू आहेत. धोनी विषयी आता भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितलं की, 'धोनी एक महान खेळाडू आहे. मी त्याला चांगला ओळखतो आणि तो कधीही स्वत:ला संघावर थोपवणार नाही. त्याला जर वाटत असेल आपण पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत खेळू शकतो. तर तो नक्की खेळेल. त्यावर कोणीही सवाल उपस्थित करायला नको.'
धोनीला ब्रेक हवा आहे, मात्र तो आयपीएल खेळणार आहे. आयपीएलनंतर जर त्याला वाटले की, आपण भारतीय संघाकडून खेळू शकतो, तर त्यावर कोणीही प्रश्न उपस्थित करू नये. निर्णय घेण्याचा अधिकार त्याचा आहे, असेही शास्त्रींनी सांगितले.