दुबई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा भारतीय संघाने जिंकला. ही मालिका आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत होत आहे. भारताच्या विजयानंतर आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघ न्यूझीलंडला मागे सारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
मेलबर्न कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये बदल झाले. भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे नुकसान झाले. तरीदेखील ऑस्ट्रेलियाचा संघ क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे. पण न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यांचे दुसरे स्थान भारताने काबीज केले आहे.
सद्यस्थितीमध्ये ऑस्ट्रेलिया संघाची विजयी सरासरी ७७ टक्के इतकी आहे. तर भारतीय संघाची विजयी सरासरी टक्केवारी ७२ इतकी आहे. न्यूझीलंड ६२ च्या सरासरीसह तिसऱ्या तर ६० च्या सरासरीसह इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा संघ ३९ च्या सरासरी टक्केवारीसह पाचव्या स्थानी आहे.