लंडन- लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा २३ धावांनी पराभव केला. श्रीलंकेने दिलेल्या ३३९ धावांचे आव्हान कॅरिबियन खेळाडूंना पेलवलेच नाही. विंडीजची धावसंख्या १२ वर असताना सलामीवीर सुनिल बाद झाला. त्यानंतर एकानंतर एक गडी बाद होत गेले. तेव्हा निकोलस पुरनने झंझावती झळकावत विजय मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. विंडीजचा संघ निर्धारीत ५० षटकात ९ बाद ३१५ धावांच करु शकला.
श्रीलंकेने वेस्ट इंडिजपुढे ३३९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विडींजचे फलंदाज ढेपाळले. एका पाठोपाठ एक गडी बाद होत असताना, निकोलस पुरन एक बाजू पकडून शतक झळकावत संघाच्या आशा कायम ठेवल्या. मात्र, पुरन मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने विंडिजचा पराभव झाला. पुरनने ११ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ११८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्याला ५२ धावा करत फॅबिअन एलनने साथ दिली. मात्र, तोही विंडिजचा पराभव वाचवू शकला नाही.
श्रीलंकेकडून लसिथ मलिंगाने ३ गडी बाद केले. तर कासुन रचिथा, जेफ्री वंडरसे, अँजेलो मॅथ्यूज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंका विरुध्दच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय वेस्ट इंडिजच्या अंगाशी आला आहे. श्रीलंकेने अविष्का फर्नांडोच्या शतकी खेळीच्या जोरावर त्रिशतकी मजल मारली. निर्धारीत ५० षटकात त्यांनी ३३८ धावा केल्या आणि विंडीजला ३३९ धावांचे आव्हान दिले होते.
श्रीलंकेच्या सलामीवीर करुणरत्ने आणि कुशल परेरा यांनी ९३ धावांची सलामी दिली. त्यानंतर मोठा फटका मारताना करुणरत्ने ३२ धावांवर बाद झाला. पण कुशल परेराने डाव सावरत अर्धशतक पूर्ण केले. मात्र तो धावा काढण्याच्या गोंधळामुळे बाद झाला. ६४ धावा करून त्याला तंबूत परतावे लागले. त्यानंतर कुशल मेंडिसच्या साथीने फर्नांडोने डाव पुढे नेला. मेंडिसने चांगली सुरुवात केली होती, पण फॅबियन ऍलनच्या गोलंदाजीवर तो त्याच्याकडेच झेल देऊन बाद झाला.
अनुभवी अँजेलो मॅथ्यूजही २६ धावा करत बाद झाला. मात्र अविष्का फर्नांडोने एक बाजू लावून धरत शतक पूर्ण केले. त्याने १०३ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकार खेचत १०४ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर लाहिरू थिरिमन्ने याने डाव सावरत श्रीलंकेला तीनशे पार केले. तर वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने २ गडी बाद केले. शेल्डन कॉटरेल, ओशाने थॉमस, फॅबियन ऍलन याने प्रत्येकी एक गडी बाद केला.