दुबई - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेनंतर आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. यात फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू यादीत मोठे बदल झाले आहेत. मात्र, भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी आपला दबदबा, कायम राखला आहे. विराट क्रमवारीत पहिल्या तर रोहित दुसऱ्या स्थानी आहे.
आयसीसी फलंदाजीच्या क्रमवारीत टॉप-१०मध्ये बदल झाले आहेत. पण यात टॉप-५ कायम आहे. यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरची एका स्थानाने घसरण झाली आहे. याचा फायदा न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला झाला आहे. तो एका क्रमाने ६व्या स्थानी पोहोचला आहे. याशिवाय जॉनी बेअरस्टो टॉप-१०मध्ये दाखल झाला आहे. क्विंटन डी-कॉक १०व्या तर बेअरस्टो ९ व्या स्थानी पोहोचला आहे.
गोलंदाजी क्रमवारीत ख्रिस वोक्स सातव्या स्थानी पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सची दोन क्रमाने घसरण होत, तो सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. जोश हेझलवूडची क्रमवारी वधारली असून तो ७व्या स्थानी पोहोचला आहे. मिचेल स्टार्क ९व्या स्थानावर कायम आहे. तर इंग्लंडचा जोफ्रा ऑर्चरने मोठी झेप घेत टॉप-१० मध्ये जागा मिळवली आहे.