मुंबई- लॉकडाऊनच्या काळात २४ तास घरी असल्यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन बिघडत असल्याचे समोर आले. तेव्हा राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि एमपॉवर यांनी हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून मानसिक संतुलन कसे राखावे, याबाबत फ्री समुपदेशन केले जात आहे. या उपक्रमाचे भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने कौतुक केले आहे.
अजिंक्यने या विषयासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'लॉकडाऊनच्या काळात मानसिक स्वास्थ महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि एमपॉवर यांनी मानसिक स्वास्थाशी झगडणाऱ्या लोकांना मोफत समुपदेशनासाठी एक हेल्पलाईन सुरु केली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे.'
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. आज लॉकडाऊनचा ९ वा दिवस आहे. अशात हाताला काम नसल्याने अनेकांचे मानसिक संतुलन बिघडत असल्याचे समोर आले. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. यामुळे अशा व्यक्तींसाठी राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि एमपॉवर यांनी हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. त्यात मानसिक संतुलन कसे राखावे याबाबत फ्री समुपदेशन केले जात आहे.