लंडन -भारताचा अष्टपैलू आणि स्टार खेळाडू हार्दिक पांड्याला लंडनमध्ये नुकत्याच एका शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. हार्दिकला मागील अनेक दिवसांपासून पाठीच्या दुखापतीचा त्रास होत होता. या दुखापतीवरील उपचारासाठी त्याने लंडनला जाण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा -अवघ्या ७० धावांवर ऑलआऊट झाली टीम इंडिया, तरीही हरमनप्रीतने गाठले शतक..
लंडनमध्ये पार पडलेली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. हार्दिकने ट्विटरवरून याबद्दल माहिती दिली. त्याने आपल्या ट्विटमध्ये एक फोटोही शेअर केला आहे. 'शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. सर्वांच्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद. मी लवकरच पुनरागमन करेन. तोपर्यंत मला मिस करा', असे हार्दिकने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
आगामी बांगलादेश विरुध्दच्या टी-२० मालिकेसह पुढील काही महिन्यांपर्यंत हार्दिक क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याला मागील वर्षी दुबईत झालेल्या एशिया कप स्पर्धेत पाठीची दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत पुनरागमन केले होते.आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेदरम्यान पाठीला दुखापत होणारा हार्दिक भारताचा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली आहे. यामुळे बुमराहने आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली.