नवी दिल्ली - भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते गौतम गंभीरला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. भारताला विश्वकरंडक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरने गेल्यावर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती.
गौतम गंभीरचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मान - निवृत्ती
भारताला विश्वकरंडक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरने गेल्यावर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती.
गौतम गंभीरने २००३ साली भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. गंभीरने सचिन आणि सेहवाग यांच्या उपस्थितीत संघातील स्थान मजबूत केले होते. भारतीय संघासाठी सलामीसाठी फलंदाजी करताना अनेक विक्रमही त्याने नावावर केले. २००७ साली झालेल्या टी-ट्वेन्टी विश्वकरंडक स्पर्धेत त्याने अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध महत्वपूर्ण खेळी करत भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला होता. २०११ च्या विश्वकरंडकातही अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध चांगली फलंदाजी करत भारताच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. गौतम गंभीरने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला २ वेळा विजेतेपद मिळवून दिले होते.
गौतम गंभीरने भारतासाठी ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी-ट्वेन्टी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४ हजार १५४ धावा कसोटीमध्ये तर, ५ हजार २३८ धावा एकदिवसीय क्रिकेटमध्ये केल्या आहेत. टी-ट्वेन्टी मध्ये गंभीरने ९३२ धावा केल्या आहेत.