नवी दिल्ली - भारातीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर चांगलाच भडकला आहे. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात इम्रान खान यांनी केलेल्या भाषणावर गंभीरने त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना गंभीरचे खडे बोल हेही वाचा -विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप : भारतीय रिले संघ अंतिम फेरीत दाखल
इम्रान खान यांनी अधिवेशनात आपले पहिले भाषण केले. त्यांच्या या ५० मिनिटांच्या भाषणात भारत आणि काश्मीरचा उल्लेख वारंवार करण्यात आला होता. याच मुद्द्यावर गंभीरने इम्रान खान यांना धारेवर धरले आहे. 'प्रत्येक देशाला १५ मिनिटे बोलण्यासाठी दिली होती. त्यात कोणी काय करते हे त्याचे चरित्र आणि बौद्धिकता सांगते. शांतता आणि विकासाबद्दल मोदी बोलत असताना, पाकिस्तानी सैन्याच्या या बाहुल्यानेच अणु युद्धाची धमकी दिली. यानेच आधी काश्मीरमध्ये शांतता टिकवण्याची भाषा केली होती', असे गंभीरने म्हटले आहे.
इम्रान खान यांनी जम्मू-काश्मीर येथील रक्तपाताचे आणि दहशतवादाचे झोंबणारे वर्णन करत भारतावर हल्ला चढवला. हे भाषण त्यांना देण्यात आलेल्या १५ मिनिटांहून अधिक वेळ चालले. त्यानंतर भारताकडून त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवण्यात आला. 'भारताशी पारंपरिक युद्ध सुरू झाल्यास काहीही होऊ शकते. असे झाल्यास आमच्यासमोर पर्याय उरणार नाही. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू,' असे खान म्हणाले होते.