केपटाउन- कोरोनाच्या धोक्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका, पहिल्या सामन्यानंतर रद्द करण्यात आली. यामुळे आफ्रिकेचा संघ मायदेशी परतणार आहे. पण त्यांना मुंबई आणि दिल्लीतील कोरोनाच्या फैलावामुळे कोलकाता आणि दुबईमार्गे आफ्रिकेला पाठवले जाणार आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील धर्मशाळा येथील पहिला सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. यानंतर दुसरा सामना खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ लखनऊमध्ये दाखल झाला होता. तेव्हा कोरोनाच्या धोक्यामुळे उर्वरित मालिका रद्द करण्यात आल्याची घोषणा, बीसीसीआयने केली.
दरम्यान, कोरोनाच्या धोक्यामुळे लखनऊ येथून आफ्रिकेचा संघ दिल्ली किंवा मुंबई मार्गे न जाता तो कोलकाता मार्गे मायदेशी परतणार आहे. आफ्रिकेचा संघ लखनऊ येथून कोलकाता आणि कोलकाता येथून दुबई मार्गे आफ्रिकेला रवाना होईल.
कोलकातामध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यामुळे आफ्रिका संघाच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोलकाता सुरक्षित ठिकाण आहे. यामुळे आफ्रिकेचा संघ या ठिकाणाहून आफ्रिकेला प्रयाण करेल.