कराची -पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आफ्रिदीने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. गुरुवारपासून प्रकृती ठीक नसल्याचे त्याने सांगितले आहे. कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला असून या व्हायरसचा शिरकाव क्रीडाविश्वातही झाला आहे.
आफ्रिदीचे ट्विट -
पाकिस्तानच्या 40 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने 2016 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने 20 वर्षाच्या करिअरमध्ये 27 कसोटी, 398 एकदिवसीय सामने आणि 99 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने अनुक्रमे 1716, 8064, 1416 धावा केल्या आहेत. आफ्रिदीने आयपीएलमध्ये 10 सामने खेळले असून त्यात त्याने 81 धावा केल्या आहेत.
तौफीक उमरची कोरोनावर मात -
काही दिवसांपूर्वी, पाकिस्तानचा माजी सलामीवीर तौफीक उमर कोरोनामुक्त झाला. उमरला गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याला घरामध्येच क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याच्यावर उपचारही सुरू होते. आता त्याचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनावर मात केल्यानंतर उमरने लोकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.