नवी दिल्ली -पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने कुटुंबाच्या झालेल्या दुसऱ्या कोरोना चाचणीबाबत माहिती दिली आहे. ही चाचणी निगेटिव्ह आली असल्याचे त्याने ट्विटरवर सांगितले. माध्यमाच्या अहवालांनुसार, आफ्रिदीही पूर्णपणे बरा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन आठवड्यांपूर्वी शाहिद आफ्रिदीला कोरोना झाल्याचे उघड झाले होते. इतकेच नव्हे तर, आफ्रिदीसमवेत त्याचे कुटुंबही या व्हायरसच्या संकटात सापडले होते. मात्र, आता पत्नी आणि दोन मुलींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याचे आफ्रिदीने ट्विटरवर सांगितले.
आपल्या चाहत्यांच्या आशीर्वादाबद्दल आफ्रिदीने ट्विटरवर आभार मानले होते. त्याने आपल्या लहान मुलीचा फोटोही शेअर केला. "अल्हमदुल्लाह, माझी पत्नी आणि मुली अक्सा, अंशा यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तुमच्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद'', असे आफ्रिदीने ट्विटरवर म्हटले आहे.
आफ्रिदीचा मैदानावरील कट्टर विरोधक असलेल्या गौतम गंभीरनेही आपली प्रतिक्रिया दिली होती. ''या व्हायरसची लागण कोणालाही होऊ नये. आफ्रिदीशी माझे काही बाबतीत मतभेद आहेत, पण लवकरात लवकर तो बरा व्हावा अशी मी प्रार्थना करतो'', असे गंभीरने म्हटले होते.
40 वर्षीय आफ्रिदीने 2016 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने 20 वर्षाच्या करिअरमध्ये 27 कसोटी, 398 एकदिवसीय सामने आणि 99 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने अनुक्रमे 1716, 8064, 1416 धावा केल्या आहेत. आफ्रिदीने आयपीएलमध्ये 10 सामने खेळले असून त्यात त्याने 81 धावा केल्या आहेत.