नवी दिल्ली -मागच्या काही काळापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या महेंद्रसिंह धोनीबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. चाहत्यांना धोनीला परत एकदा टीव्हीवर पाहता येणार असून भारतीय क्रिकेट संघाचा हा माजी कर्णधार लवकरच एका टीव्ही मालिकेत झळकणार आहे.
हेही वाचा -रशियाला 'वाडा'चा दणका, ऑलिम्पिकसह फुटबॉल विश्वकरंडकातून पत्ता कट
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, धोनी या मालिकेद्वारे लष्करी अधिकाऱ्यांच्या शौर्यगाथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. एका निर्मीती कंपनीसोबत धोनी या मालिकेची निर्मिती करणार आहे. परमवीरचक्र व अशोकचक्र विजेत्या पराक्रमी जवानांच्या यशोगाथा या मालिकेतून सांगण्यात येतील. भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल (मानद) पदावर धोनी कार्यरत आहे.
धोनी २०१९ विश्वचषक स्पर्धेनंतर काही काळासाठी क्रिकेटपासून लांब आहे. नुकताच तो आपल्या परिवारासोबत 'क्वॉलिटी टाइम' व्यतित करताना दिसून आला होता. धोनी आणि त्याची पत्नी साक्षीने गायक जेस्सी गिल याच्या ३१ व्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीचे काही 'इनसाइड' फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
धोनीने विश्वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंड विरुध्दच्या सामन्यानंतर एकही क्रिकेटचा सामना खेळलेला नाही. भारतीय संघाने विश्वकरंडक स्पर्धेनंतर तीन देशांविरुध्द मालिका खेळल्या आहेत. धोनीने वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुध्दच्या मालिकांमधून माघार घेतली होती.