मुंबई - माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हकालपट्टी केली. कामावरील नाराजीच्या कारणास्तव ही हकालपट्टी केल्याचे सर्वत्र म्हटले जात आहे. या हकालपट्टीनंतर, मांजरेकरांनी मौन सोडत ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा -कोरोना : राज्य शासन, बीएमसीच्या कामाला सलाम! क्रिकेटपटूने केलं कौतूक
'व्यावसायिक असल्यामुळे मी बीसीसीआयच्या निर्णयाचा स्वीकार करतो. समालोचनाला मी सन्मान समजत आलो आहे. माझी या कामासाठी निवड करायची किंवा नाही हा बोर्डाचा निर्णय आहे, पण मी नेहमीच याचा आदर करेन. अलीकडच्या कालावधीत बीसीसीआय कदाचित माझ्या कामावर खूश नव्हते', असे मांजरेकर यांनी म्हटले आहे.
मांजरेकरांनी सीएएविरुद्ध मुंबईमध्ये झालेल्या रॅलीचे समर्थन केले होते. बीसीसीआयच्या समालोचन पॅनलमधून वगळण्याचे कारण नागरिकता संशोधन कायद्याला (सीएए) विरोध आणि जेएनयूचे समर्थन असल्याचेही म्हटले जात आहे. त्यांनी जेएनयूमध्ये झालेल्या हाणामारीचा विरोध केला होता. मांजरेकर यांनी अनेकदा सीएएचा सार्वजनिक विरोध केलेला आहे.
माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी गेल्या तीन विश्वचषकासाठी आणि आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्येही समालोचन केले आहे. १९९६ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून संजय मांजरेकर सातत्याने समालोचन करत आहेत.