दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता चेन्नई सुपर किंग्ज सलामीच्या सामन्यात एकमेकांसमोर उभे टाकतील. हा सामना कोण जिंकणार? यांची उत्सुकता तमाम क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. अशात सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्जवर वरचढ ठरेल, अशी भविष्यवाणी भारतीय संघाच्या माजी सलामीवीर गौतम गंभीरने केली आहे.
गंभीर म्हणाला, चेन्नईच्या संघात सुरेश रैनाचीही अनुपस्थिती चिंतेचा विषय असेल, तसेच मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांचा सामना करणे, चेन्नई सुपर किंग्जसाठी कठीण असेल. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नईच्या संघावर वरचढ ठरेल.
दरम्यान, आयपीएल २०२०मध्ये चेन्नई सुपर किंग्जची डोकेदुखी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. चेन्नईचा कोरोनाबाधित मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी याची माहिती दिली.