नवी दिल्ली -माजी भारतीय सलामीवीर वसीम जाफरला आगामी रणजी हंगामासाठी उत्तराखंड संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यावर्षी 7 मार्चला जाफर आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्त झाला. 1996 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा हा क्रिकेटपटू भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये एक 'दिग्गज' खेळाडू म्हणून ओळखला जातो.
जाफर म्हणाला, "होय, मला एका वर्षासाठी उत्तराखंडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मी खूप आनंदी आणि उत्साही आहे. कारण मुख्य प्रशिक्षक म्हणून माझा हा पहिला कार्यकाळ असेल. खेळाडूंचे जीवन आणि करिअर बदलण्याचा मी प्रयत्न करेन.''
"माझ्यासाठी विजय सर्व काही आहे. त्यामुळे जिंकण्याची सवय संघात आणण्याचा माझा प्रयत्न असेल, जेणेकरून येत्या मोसमात हे खेळाडू चांगले कामगिरी करु शकतील", असेही जाफरने सांगितले.
जाफरने 260 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. मुंबई संघाचा सलामीवीर म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारा जाफर नंतर विदर्भाकडे वळला. दोनदा रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघासाठी त्याने मोलाचे योगदान दिले.
वसीम जाफरने भारताकडून 31 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 1 हजार 944 धावा केल्या आहेत. तसेच त्याला 2 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 18 हजार पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. तसेच रणजी ट्रॉफीत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.