ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज ब्रुस यार्डली यांचे निधन
ब्रूस यांनी श्रीलंकंन क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारीही सांभाळली होती.
ब्रुस यार्डली
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज ब्रुस यार्डली यांचे आज निधन झाले. ऑस्ट्रेलियातील एका रुग्णालयात ७१ व्या वर्षी कॅन्सरशी झुंज देताना आज अखेरचा श्वास घेतला. ब्रुस यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.
ब्रुस यांनी वेगवान गोलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दिची सुरुवात केली, मात्र ते फिरकी गोलंदाज म्हणून जगभर प्रसिद्ध झालेत. ब्रूस यांनी १९७८ ला भारताविरुध्द कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर याच साली वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला सामना खेळला.
ऑस्ट्रेलियासाठी ब्रूस यांनी ३३ कसोटी सामने खेळताना १२६ विकेट घेतले आहेत. तर ७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७ विकेट नावावर केले आहेत. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ब्रूस यांनी १०५ सामने खेळताना तब्बल ३४४ गडी गारद केले आहेत. ब्रूस यांनी श्रीलंकंन क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारीही सांभाळली होती.