लाहोर - श्रीलंकेने तिसऱ्या आणि अखेरचा सामना जिंकत टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या पाकिस्तानला ३-० ने क्लीन स्वीप दिले. लंकेने मालिकेतील अखेरचा सामना १३ धावांनी जिंकला. दरम्यान पाकिस्तान संघाने २०१९ मध्ये ७ सामने खेळले असून यातील ६ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.
लाहोरच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद १४७ धावा केल्या. पदार्पणाचा पहिला सामना खेळणाऱ्या ओशादा फर्नांडोने नाबाद ७८ धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मदत केली.
१४८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतलेल्या पाकिस्तानचा संघ २० षटकात ६ बाद १३४ धावा करु शकला. पाकचा सलामीवीर फखर झमान भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या जोडीसाठी हरिस सोहेल आणि बाबर आझम यांनी ७६ धावांची भागिदारी केली. दोघेही बाद झाल्यानंतर पाकला ३० चेंडूत ५४ धावाची गरज होती. मात्र, लंकेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत पाकला १३४ धावांवर रोखत सामना जिंकला.