नवी दिल्ली - टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरचा आज ३८ वा वाढदिवस. गंभीरचा जन्म १४ ऑक्टोबर १९८१ साली दिल्लीमध्ये झाला. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करत गंभीरने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याचे रेकॉर्ड निवृत्तीनंतर अद्याप कायम आहेत. गंभीरच्या वाढदिवसानिमित्तानं त्यानं खेळलेल्या 'त्या' तीन दमदार खेळी वाचा...
गौतम गंभीरकडे विरेंद्र सेहवागसारखी ना आक्रमकता होती, ना सुनिल गावस्कर यांच्यासारखी तंत्रशुध्दता होती. मात्र, तो जिद्दीच्या जोरावर टीम इंडियासाठी तब्बल १५ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याने संघाच्या विजयात अनेक वेळा मोलाचे योगदान दिले.
गौतम गंभीरने खेळलेल्या आठवणीतील 'त्या' खेळी -
नेपियर येथे झालेल्या न्यूझीलंडविरुध्दच्या कसोटी सामन्यात गौतम गंभीरने तब्बल १३ तास एक बाजू पकडून फलंदाजी केली. त्याने या सामन्यात १३६ धावांची खेळी केली. त्यांच्या शतकापेक्षा, त्याने न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाचा केलेला सामना याचीच चर्चा जास्त रंगली.
२००७ आयसीसी टी-२० विश्वकरंडक -
दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे पहिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुध्द कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघात झाला. या सामन्यात गौतम गंभीरने युसूफ पठाण सोबत सलामी दिली. यूसूफ बाद झाल्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज एकामागून एक बाद होते. तेव्हा गंभीरने एक बाजू पकडत ५४ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. गंभीरच्या या खेळीमुळेच भारतीय संघ १५७ धावा धावफलकावर लावू शकला. या सामन्यात श्रीसंतने शेवटच्या क्षणी घेतलेल्या झेलमुळे गंभीरची 'ती' खेळी अंधुक ठरली.
२००७ आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करताना गंभीर... २०११ आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक -
विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना वानखडे मैदानात भारत विरुध्द श्रीलंका संघात झाला. भारताचे मुख्य फलंदाज सचिन-सेहवाग लवकर बाद झाले होते. तेव्हा गंभीरने ९७ धावांची खेळी केली होती. मात्र, या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने मारलेला षटकार लोकांच्या स्मरणात राहिला आणि गंभीरची ती खेळी मागे पडली. एक गोष्ट त्या सामन्यात घडली. ती म्हणजे, धावबाद होण्याच्या भीतीने गंभीरने सुर मारत क्रीझ गाठले होते. त्यावेळी त्याची जर्सी घामाने भिजलेल्या अवस्थेत असल्याने त्याला माती लागली आणि ती घाण झाली. गंभीर मात्र, तशाच खेळत राहिला.
२०११ आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेविरुध्द खेळताना गंभीर.... दरम्यान गंभीरला २००९ साली आयसीसीकडून सर्वश्रेष्ठ कसोटी फलंदाजाचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गंभीर सद्या क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती स्वीकारत राजकारणाच्या मैदानात आहे. त्याने २०१९ लोकसभा निवडणूक दिल्ली येथून भाजपकडून लढवली आणि तो खासदार झाला आहे.