डरबन- पहिल्या सामन्याप्रमाणे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामनाही रोमांचक ठरला. टॉम कुरनने अखेरच्या दोन चेंडूवर दोन गडी बाद करत इंग्लंडला २ धावांनी विजय मिळवून दिला. पहिल्या सामन्यात यजमान आफ्रिकेने १ धावेने बाजी मारली होती. तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २०४ धावा केल्या होत्या. आफ्रिकेचा संघ ७ बाद २०२ धावा करु शकला. या विजयासह इंग्लंडने ३ सामन्याच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे.
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा इंग्लंडने बेन स्टोक्स (४७), जेसन रॉय (४०), मोईन अली (३९) आणि जॉनी बेअरस्टोव्हच्या ३५ धावांच्या जोरावर २० षटकात २०४ धावा केल्या. इंग्लंडची सुरूवात खराब झाली. जोस बटलर २ धावांवर माघारी परतला. तेव्हा रॉय आणि बेअरस्टोव्ह यांनी ५० धावांची भागिदारी केली. फेहलुकवाया याने बेअरस्टोव्हला (३५) बाद करत आफ्रिकेला दुसरे यश मिळवून दिले. यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना छोट्या छोट्या भागिदारी केल्या. मोईन अलीने आक्रमक फलंदाजी केली. त्याने ११ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारासह ३९ धावा चोपल्या.
इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरूवात धडकेबाज झाली. सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बावुमा यांनी ७.५ षटकात ९२ धावांची सलामी दिली. यादरम्यान डी कॉकने अर्धशतक पूर्ण केले. मार्क वुडने काही धावांच्या अंतरात आफ्रिकेला दोन धक्के दिले. त्याने डी कॉक आणि बावुमाला (३१) माघारी धाडले. डी कॉकने २ चौकार आणि ८ षटकारासह ६५ धावा केल्या. यानंतर आफ्रिकेची मधली फळी कोसळली. डेव्हीड मिलर (२१), जेजे स्मटर्स (१३), फेहलुकवाया (०) स्वस्तात माघारी परतले. यादरम्यान, वॅन डर डुसेन याने एक बाजू पकडून नाबाद ४३ धावांची खेळी केली. अखेरच्या क्षणी प्रेटोरियस १३ चेंडूत २५ धावा करत संघाला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र त्याला संघाला विजयापर्यंत पोहचवता आलं नाही. वूड आणि जार्डन आणि कुरन यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर बेन स्टोक्सने एक गडी टिपला. ३९ धावांची आक्रमक खेळी करणारा मोईन अली सामनावीर ठरला.