मँचेस्टर - ऑस्ट्रेलियाने विश्वविजेता इंग्लंडला तीन सामन्याच्या मालिकेत २-१ ने मात दिली. तिसऱ्या आणि अखेरच्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखून विजय मिळवला. इंग्लंडने दिलेले ३०३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेल आणि अॅलेक्स कॅरी यांनी झळकावलेल्या दमदार शतकांच्या जोरावर पूर्ण केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात लागोपाठ दोन धक्के देत इंग्लंडला बॅकफूटवर आणले.
इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तेव्हा मिचेल स्टार्कने डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर जेसन रॉयला झेलबाद केले. बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न करताना, चुकलेला फटका गलीमध्ये थांबलेल्या मॅक्सवेलच्या हातात जाऊन विसावला. यानंतर पुढच्याच चेंडूवर स्टार्कने जो रूटदेखील इनस्विंग चेंडूवर बाद झाला. स्टार्कने टाकलेला चेंडू रूटला समजण्याआधीच पायावर आदळला आणि तो पायचीत झाला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था २ बाद शून्य धावा अशी झाली होती.
तेव्हा जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी १० षटके खेळून काढली. मॉर्गन २३ धावांवर बाद झाला. त्याला झम्पाने स्टार्ककडे झेल देण्यास भाग पाडले. दुसरीकडून बेअरस्टोने बिलिंग्स सोबत ११४ धावांची भागिदारी केली. या दरम्यान, त्याने आपल्या कार्यकिर्दीतील १० वे शतक पूर्ण केले. बेअरस्टोने १२ चौकार आणि २ षटकारांसह ११२ धावांची खेळी केली. त्याचा अडथळा पॅट कमिन्सने दूर केला. यानंतर ख्रिस वोक्सने ३९ चेंडूत नाबाद ५३ धावा काढत इंग्लंडला तीनशेचा आकडा पार करुन दिला.
विजयासाठी ३०३ धावांचे विशाल लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ७३ धावांतच माघारी परतला. अॅरोन फिंच (१२), मार्नस स्टोनिस (४), डेव्हिड वॉर्नर (२४), मिचेल मार्श (२०), मार्नस लाबुशेन (२) झटपट बाद झाले. यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि अॅलेक्स कॅरी या जोडीने सहाव्या गड्यासाठी २१२ धावांची भागिदारी केली. यादरम्यान, मॅक्सवेलने दुसरे तर कॅरीने आपल्या करिअरमधील पहिले शतक पूर्ण केले. मॅक्सवेल-कॅरी विजयासाठी १८ धावा कमी असताना मोक्याच्या क्षणी बाद झाले. तेव्हा मिचेल स्टार्कने शेवटच्या षटकात, षटकार आणि चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ग्लेन मॅक्सवेल सामनावीर आणि मालिकावीर ठरला.