दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज दोन सामने खेळवण्यात येणार आहेत. यात पहिला सामना दुपारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघाचा हा नववा सामना असून या सामन्याला भारतीय वेळेनुसार ३ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होईल.
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांनी आपला अखेरचा सामना गमावला आहे. राजस्थानला दिल्लीने तर, बंगळुरूला पंजाबने पराभूत केले होते. या हंगामात दोन्ही संघानी प्रत्येकी ८-८ सामने खेळले आहेत. यात बंगळुरूने पाच विजय मिळवले आहेत. तर, तीन सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे, राजस्थानला तीन सामन्यांत विजय साकारता आला आहे. तर, ते पाच सामन्यांत पराभूत झाले आहेत. गुणतालिकेत बंगळुरू तिसऱ्या तर, राजस्थान सातव्या स्थानी आहे.
स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वात राजस्थानने स्पर्धेची सुरुवात धडाक्यात केली. पण त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. बेन स्टोक्स संघात परतल्याने राजस्थानचा संघ मजबूत झाला आहे. पण त्याला खेळपट्टीवर अधिकाधिक वेळ घालवून फटकेबाजी करावी लागणार आहे. स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन सुरुवातीचे सामने वगळता फ्लॉप ठरले आहेत. रॉबिन उथप्पा, रियान पराग यांना आपली कामगिरी उंचवावी लागेल. राहुल तेवतिया अष्टपैलू कामगिरी करत आहे. गोलंदाजीत जोफ्रा ऑर्चर, कार्तिक त्यागी, जयदेव उनादकड यांनी प्रभावी मारा केला आहे.
दुसरीकडे, बंगळुरूचा संघ लयीत आहे. देवदत्त पडीक्कल, अॅरोन फिंच ही सलीमीवीर जोडी आरसीबीला आश्वासक सुरूवात करून देण्यात यशस्वी ठरत आहे. तसेच विराट कोहली देखील सुसाट फॉर्मात आहे. याशिवाय एबी डिव्हिलियर्सने मागील सामना वगळता आपल्या कामगिरीतील सातत्य राखण्यात यशस्वी ठरला आहे. ख्रिस मॅरिस सर्व आघाड्यामधून संघासाठी योगदान देत आहे. गोलंदाजीत युजवेंद्र चहल आणि वॉशिग्टन सुंदर आरसीबीसाठी हुकमी एक्के ठरले आहेत. शिवाय नवदीप सैनी, इसुरू उडाना, शिवम दुबे यांच्यासह मोहम्मद सिराजही प्रभावी मारा करत आहे.