कोलकाता- भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्याआधीच बांगलादेशला एक धक्का बसला आहे. बांगलादेशचा २१ वर्षीय सलामीवीर फलंदाज सैफ हसनला दुखापत झाली असून तो या सामन्यात खेळू शकणार नाही.
इंदूर कसोटी सामन्यात सैफ राखीव क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला होता. या कसोटीत त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. यामुळे तो कोलकाता कसोटी सामना खेळणार नाही, यांची माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिली आहे.
बांगलादेशचे सलामीवीर इम्रुल कायस आणि शादमान इस्लान यांना पहिल्या कसोटीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. दोघेही सामन्याच्या दोनही डावात प्रत्येकी ६ धावांवर बाद झाले. यामुळे कोलकाता कसोटीत सैफ यांची सलामीवीर म्हणून संघात वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र, दुखापतीमुळे तो आता हा सामना खेळू शकणार नाही.