लंडन- मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर, स्टिव स्मिथ आणि कॅमरुन बेनक्राफ्टवर १६ महिन्यांची बंदी आयसीसीने घातली. बंदीच्या शिक्षेनंतर हे खेळाडू पुन्हा मैदानात उतरले असून सध्या हे खेळाडू इंग्लंड विरुध्द अॅशेस मालिका खेळत आहेत. बंदीनंतर तिघांनी माफी मागितली तरी प्रेक्षक आजही त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत असल्याचे दिसून येत आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी वॉर्नर, बेनक्राफ्ट आणि स्मिथची हुर्रे उडवली. वॉर्नर आणि बेनक्राफ्ट बाद झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना सँण्डपेपर दाखवले. तर स्मिथ फलंदाजी करत असताना प्रेक्षकांनी स्मिथ रडत असलेली मुखवटे परिधान करत त्याला डिचकवण्याचा प्रयत्न केला.