नवी दिल्ली - विंडीजचा धडाकेबाज अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरेन सॅमीला पाकिस्तानचे मानद नागरिकत्व मिळण्याची चिन्हे आहेत. पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) च्या पेशावर झल्मीचे मालक जावेद आफ्रिदी यांनी या गोष्टीचा खुलासा केला. पाकिस्तानातील विशेषतः लीगमधील योगदानामुळे सॅमीच्या गौरवासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आफ्रिदी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -'जडेजा रॉकस्टार, मला त्याच्यासारखं क्रिकेट खेळायचंय'
'आम्ही डॅरेन सॅमीसाठी पाकिस्तानच्या मानद नागरिकत्वासाठी विनंती केली आहे. हा निर्णय राष्ट्रपतींकडे असून पीसीबी अध्यक्षांना यासाठी मी विनंती केली आहे. पाक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांकडून शिफारस आल्यानंतर सॅमीच्या नागरिकत्वाबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो', असे जावेद आफ्रिदी यांनी एका स्थानिक संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
'माझ्यासाठी प्रेम हृदयात आहे. ही एक कृती आणि भावना आहे. मला वाटते की या देशासाठी माझे योगदान हे सर्व आतून आहे. या देशासह स्वत: ला जोडण्यासाठी मला पासपोर्टची आवश्यकता नाही. फक्त मीच नव्हे तर येथे आलेल्या सर्वजणांनी पाठिंबा दर्शवला आहे. वर्ल्ड इलेव्हन असो वा अन्य संघ, पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परत आणण्यात सर्वांनी मोठी भूमिका बजावली आहे', असे सॅमीने नुकतेच माध्यमांना सांगितले होते.