नवी दिल्ली -पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर पुन्हा एकदा आरोप केला आहे. नव्या आरोपामध्ये त्याने पीसीबीने पाठिंबा न दिल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याने ट्विटरवर केलेल्या टिप्पणीवर कनेरियाने प्रतिक्रिया व्यक्त केली. इंझमामने यूट्यूबवर दिलेल्या मुलाखतीत म्हटले, ''2006 मध्ये विंडीजचा दिग्गज ब्रायन लारासमोर कनेरियाने गोलंदाजी केली होती. ब्रायन लाराने कनेरियाचा प्रत्येक चेंडू प्रत्येक दिशेने सहजतेने खेळला होता.
यावर कनेरिया म्हणाला, ''मी माझ्या कारकीर्दीत पाच वेळा लाराला बाद केले. तो खूप चांगला क्रिकेटपटू आहे. जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मला पाठिंबा दिला असता तर मी अजून बरेच विक्रम मोडले असते.'' या ट्विटमध्ये त्याने ब्रायन लारा आणि इंझमाम यांना टॅग देखील केले आहे.
या कसोटी सामन्यात पाकिस्तानने 357 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडीज संघाने लाराच्या 216 धावांच्या मदतीने 591 धावा केल्या. हा सामना अनिर्णित राहिला होता. दानिश कनेरियाने 61 कसोटी सामन्यात एकूण 261 आणि 18 एकदिवसीय सामन्यात 15 बळी घेतले आहेत.