महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

CSK vs KXIP : पंजाब 'प्ले-ऑफ'च्या शर्यतीतून बाहेर.. धोनी सेनेचा ९ गडी राखून विजय - चेन्नईचा पंजाबवर ९ गडी राखून विजय

चेन्नईविरूद्धच्या 'करो वा मरो'च्या सामन्यात पंजाबच्या संघाला ९ गड्यांनी पराभवाला सामोरे जावे लागले. दीपक हुड्डाच्या नाबाद ६२ धावांच्या खेळीमुळे पंजाबने २० षटकात १५३ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना पुणेकर ऋतुराज गायकवाडने स्पर्धेत सलग तिसरे अर्धशतक झळकावत चेन्नईला दणदणीत विजय मिळवून दिला.

CSK vs KXIP Live Score, IPL 2020 Latest Match updates:
CSK vs KXIP : पंजाब 'प्ले-ऑफ'च्या शर्यतीतून बाहेर.. धोनी सेनेचा ९ गडी राखून विजय

By

Published : Nov 1, 2020, 3:05 PM IST

Updated : Nov 1, 2020, 7:26 PM IST

अबुधाबी -चेन्नईविरूद्धच्या 'करो वा मरो'च्या सामन्यात पंजाबच्या संघाला ९ गड्यांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासह पंजाबच्या प्ले-ऑफच्या आशा संपुष्टात आल्या. दीपक हुड्डाच्या नाबाद ६२ धावांच्या खेळीमुळे पंजाबने २० षटकात १५३ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना पुणेकर ऋतुराज गायकवाडने स्पर्धेत सलग तिसरे अर्धशतक झळकावत चेन्नईला दणदणीत विजय मिळवून दिला. त्याला फाफ डु प्लेसिस आणि अंबाटी रायुडूची चांगली साथ लाभली. गायकडवाडने ४९ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ६२ धावांची खेळी साकारली.

पंजाबने विजयासाठी दिलेल्या १५४ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या सलामीवीरानी दणकेबाज सुरूवात केली. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांना धुतले. दोघांनी ९.५ षटकात ८२ धावांची सलामी दिली. ख्रिस जॉर्डनने पंजाबला पहिले यश मिळवून दिले. त्याने डु प्लेसिसला राहुलकरवी झेलबाद केले. डु प्लेसिसने ३४ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा केल्या.

ऋतुराज गायकवाड आणि अंबाटी रायुडू या जोडीने अभेद्य भागिदारी करत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यादरम्यान, ऋतुराजने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४९ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ६२ धावांची खेळी साकारली. त्याला अंबाटीने ३० धावांची खेळी करत चांगली साथ दिली.

चेन्नईविरुद्धच्या करो वा मरोची स्थिती असलेल्या सामन्यात पंजाबच्या संघाला ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारता आली. मयांक आणि राहुल यांनी चांगली सुरूवात करून दिल्यानंतर पंजाबची मधली फळी कोसळली. तेव्हा दीपक हुड्डाने एका बाजू लावून धरत चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत, नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने महत्वपूर्ण ६२ धावा केल्या. त्यांच्या याच खेळीच्या जोरावर पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. तर लुंगी एनगिडीने ३ बळी टिपले.

चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा पंजाबच्या सलामीवीर जोडीने धडाकेबाज सुरूवात केली. मयांक अग्रवाल आणि केएल राहुल या जोडीने ५ षटकात बिनबाद ४८ धावा धावफलकावर लावल्या. एनगिडीने मयांकला (२६) क्लिन बोल्ड करत पंजाबला पहिला धक्का दिला. यानंतर एनगिडीच्या पुढच्या षटकात राहुल (२९) शिकार बनला. एनगिडीने त्यालाही क्लिन बोल्ड केले. यानंतर पंजाबच्या डावाला गळती लागली.

निकोलस पूरन, ख्रिस गेल स्वस्तात बाद झाले. तेव्हा मनदीप सिंग आणि दीपक हुड्डा यांनी पंजाबला तारले. दोघांनी पंजाबला शतकी टप्पा पार करून दिला. जडेजाने मनदीपचा (१४) अडथळा दूर केला. मनदीप पाठोपाठ निशम बाद झाला. दुसरी बाजू पकडून दीपक हुड्डाने फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. त्याच्या याच खेळीच्या जोरावर पंजाबला धाव संख्येपर्यंत मजल मारता आली. हुड्डाने ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६२ धावा केल्या. ख्रिस जॉर्डनने ४ धावा करत त्याला चांगली साथ दिली. चेन्नईकडून एनगिडीने ३, ताहीर आणि ठाकूर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

Last Updated : Nov 1, 2020, 7:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details