नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना येत्या शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) ३४ वर्षांचा होईल. रैना यादिवशी एक मोठी कामगिरी करणार आहे. आपल्या ३४व्या वाढदिवशी रैना उत्तर प्रदेश, जम्मू आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मधील ३४ शाळांना शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याचे वचन दिले आहे.
डावखुरा फलंदाज सुरेश रैना हा उपक्रम गार्सिया रैना फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने सुरू करणार आहे. फाउंडेशन अमिताभ शाह यांच्या सहकार्याने काम करेल. या उपक्रमाच्या माध्यमातून या शाळांमध्ये शिकणार्या १०, ०००हून अधिक मुलांना आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा मिळतील.
रैना म्हणाला, "या उपक्रमाद्वारे माझा ३४वा वाढदिवस साजरा केला जाईल, त्याचा मला आनंद झाला आहे. प्रत्येक मुल दर्जेदार शिक्षणास पात्र आहे. शाळांमधील स्वच्छ पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा हा त्यांचा हक्क आहे. मला आशा आहे, की आम्ही तरुणांना पाठिंबा देऊ शकू तसेच 'गार्सिया रैना फाउंडेशन' च्या वतीनेही महत्त्वपूर्ण योगदान देता येईल."