सिडनी - भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला असल्याची माहिती समोर आली आहे. सामना सुरु असताना सिडनी मैदानावर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी बुमराह आणि सिराजवर वर्णद्वेषी टीका केली. याची तक्रार भारतीय संघ व्यवस्थापनाने केली आहे.
सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बुमराह आणि सिराज यांनी, आम्हाला वर्णद्वेषाचा सामना करावा लागला असल्याचे कर्णधार अजिंक्य रहाणेला सांगितले. तेव्हा कर्णधार रहाणेने ही बाब प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कानावर घातली. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात झाली आहे. यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया घटनेचा तपास करून याची सर्व माहिती, बीसीसीआय आणि आयसीसीला देत आहे.
यावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी क्रिकेट एक जंटलमन खेळ आहे. यात अशा गोष्टींना थारा नाही, असे म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी बोर्डाचे सचिव जय शाह यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. ते खेळाडूंच्या संपर्कात आहेत, असे देखील स्पष्ट केले.