नवी दिल्ली - कोरोनामुळे क्रिकेट खूप दूर गेले असल्याचे मत भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने दिले आहे. या व्हायरसमुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला. कोरोनाविरूद्धच्या लढाईत निधी गोळा करण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवली गेली पाहिजे, असे मत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने नुकतेच मांडले होते. अख्तरच्या या वक्तव्यावर भज्जीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हरभजन म्हणाला, “सध्या माझ्या मनात क्रिकेट ही शेवटची गोष्ट आहे. मी त्याबद्दलही विचार करत नाही. निधी उभारण्याचे आणखीही अनेक मार्ग आहेत. सामना खेळवला जाणे आवश्यक नाही. यावेळी कोणीही क्रिकेट किंवा क्रीडा प्रकाराबद्दल विचार करीत आहे असे मला वाटत नाही. या बर्याच लहान गोष्टी आहेत. सध्या जीव महत्वाचा आहे.”