मेलबर्न- चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरामध्ये आतापर्यंत या विषाणूमुळे ६ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दीड लाखांहून अधिक लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे. जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये या विषाणूचा फैलाव झाला असून प्रत्येक देश आपापल्या परीने या विषाणूशी झुंज देत आहे. यादरम्यान, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेबाबत यजमान ऑस्ट्रेलियाने महत्त्वाची अपडेट दिली आहे.
कोरोनामुळे जगभरात अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भारतातील आयपीएल, पाकिस्तानमधील सुपर लीग यासारख्या लीग स्पर्धांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. सुपर लीग स्पर्धा तर मध्यातूनच पुढे ढकलण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. पण, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हीन रॉबर्ट यांनी सांगितले, की 'कोरोनामुळे अशी परिस्थिती उद्भवेल अशी कोणालाही कल्पना नव्हती. पण लवकर परिस्थिती सुधारेल. येत्या काही आठवड्यात सर्व क्रीडा स्पर्धा सुरळीत सुरू होतील, अशी अपेक्षा आहे आणि नियोजित वेळेनुसार म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होईल.'