सिडनी - ऑस्ट्रेलियाने गोलंदाजांच्या सुरक्षेविषयी गंभीर होत, खास गोलंदाजांसाठी हेल्मेट तयार करण्याची योजना आखली आहे. 'क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू' या संकेत स्थळाच्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाने हेल्मेट तयार करणाऱ्या कंपनीला प्रायोगिक तत्वावर गोलंदाजांसाठी हेल्मेट तयार करण्यास सांगितले आहे. हे हेल्मेट या वर्षअखेरीस तयार होतील, असे समजते.
मागील काही वर्षांमध्ये क्रिकेटविश्वात टी-२० सामन्यांमुळे चेंडूला ताकतीने फटकवण्याचा ट्रेंड वाढला आहे. यामुळे अनेक गोलंदाजांना चेंडू लागून दुखापत झाल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. वेगवान गोलदांजाने चेंडू टाकल्यानंतर, फलंदाजांने मारलेला फटका काही वेळा समजण्यापूर्वीच चेंडू गोलंदाजाला लागलो. यामुळे गोलंदाजाला गंभीर दुखापत होते.
नुकत्याच पार पडलेल्या विश्वकरंडकामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ सराव करत होता. या सरावादरम्यान, ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वार्नरने एक जोरदार फटका लगावला. तो चेंडू गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजालाच लागला. यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. या कारणाने ऑस्ट्रेलियाने गोलंदाजासाठी खास हेल्मेट तयार करण्याची योजना आखली आहे.
ऑस्ट्रेलियाकडून तयार करण्यात येणारा हेल्मेट फक्त गोलंदाजासाठीच उपयोगी ठरत नाही. तर तो क्षेत्ररक्षकांसाठीही उपयोगी ठरणार आहे. दरम्यान, याच वर्षी फलंदाजाने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू तोंडावर लागून ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू फवाद अहमदचा जबडा फॅक्चर झाला होता. यामुळे ऑस्ट्रेलियाकडून तयार करण्यात येत असलेल्या हेल्मेट यशस्वी झाला तर ते गोलंदाजांसाठी उपयोगी ठरणार आहे.
यापूर्वी 'या' गोलंदाजाने हेल्मेट घालून केली गोलंदाजी -
न्यूझीलंडमधील स्थानिक क्रिकेटपटू वॉरेन बार्न्स याने काही महिन्यापूर्वी हेल्मेट घालून गोलंदाजी केली आहे. त्याने स्थानिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आणि न्यूझीलंडमधील सुपर स्मॅश टी-२० क्रिकेट स्पर्धेत ओटागो संघाकडून हेल्मेट घालून गोलंदाजी केली होती.