मेलबर्न -माजी कसोटी क्रिकेटपटू क्रेग मॅकडर्मोट आणि महिला खेळाडू शेरन ट्रेडरिया यांना सोमवारी ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे. १९८४ मध्ये पदार्पण करणाऱया मॅकडर्मोट यांनी १९९६ पर्यंत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. आपल्या देशासाठी मॅकडर्मोट यांनी एकूण ७१ कसोटी आणि १३८ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्यांनी अनुक्रमे २९१ आणि १३८ बळी घेतले आहेत.
हेही वाचा -भारताविरूद्धच्या शेवटच्या वनडेसाठी सोधी आणि टिकनर संघात दाखल
१९८७ मध्ये भारतात झालेल्या विश्वरकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला जेतेपद मिळवून देण्यात मॅकडर्मोट यांचा मोलाचा वाटा होता. या स्पर्धेत त्यांनी एकूण १८ बळी घेतले होते. 'सर्वोत्कृष्ट महिला आणि पुरुष खेळाडूंच्या यादीत समावेश होणे ही अभिमानाची बाब आहे', असे हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाल्यानंतर मॅकडर्मोट यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, महिला खेळाडू शेरन ट्रेडरिया यांनी १९७३ ते १९८८ दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी एकूण १० कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळले असून यादरम्यान त्यांनी अनुक्रमे ३० आणि ३२ बळी घेतले आहेत. ट्रेडेरिया यांनी चार विश्वकरंडक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
६५ वर्षीय ट्रेडरिया यांनी हॉल ऑफ फेमला भव्य सन्मान म्हणून संबोधले आहे. 'हा एक मोठा सन्मान आहे. आतापर्यंत मी लोकांना हॉल ऑफ फेममध्ये सामील होताना पाहिले होते, मला वाटले की ते खरोखर महत्वाचे आहे', असे ट्रेडरिया म्हणाल्या आहेत.