मुंबई- कोरोनामुळे संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे दुर्बल घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये गरजूंच्या मदतीसाठी, सर्व स्तरातील अनेक लोकं पुढे येत आहेत. असाच एक मदतीचा व्हिडिओ भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगने शेअर केला आहे. यात एक शीख बांधव वृद्ध महिलेला मदत करताना पाहायला मिळत आहे.
हरभजन याने शेअर केलेल्या व्हिडिओत, एका वृद्ध महिलेच्या घरात जाऊन शिख व्यक्ती तिला साहित्य देतो. त्याची मदत पाहून वृद्ध महिलेच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. तेव्हा तो शीख व्यक्ती, 'रोना नही माताजी', असे म्हणतो आणि त्यानंतर तो महिलेला पैशांची मदतही देऊ करतो आणि तिथून निघून जातो.
दरम्यान हरभजनने हा व्हिडिओ शेअर करत, मदत करणारा व्यक्ती देवदूतच आहेत, अशा शब्दात त्या व्यक्तीचे कौतूक केले आहे. याशिवाय त्याने, आपण सर्वजण मिळून कोरोनाशी लढा देऊ शकतो, असा विश्वास बोलून दाखवला आहे.