बंगळुरू-सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत छत्तीसगड आणि केरळ संघाने 'अ' गटात विजय मिळवले आहेत. आपल्या आधीच्या सामन्यात मुंबईला पाणी पाजणाऱ्या छत्तीसगडने जबरदस्त कामगिरी करत आंध्र प्रदेश संघाला ५६ धावांनी मात दिली.
हेही वाचा -क्रिकेट सोडून धोनी खेळतोय 'हा' खेळ, फोटो झाले व्हायरल
नाणेफेक हरलेल्या छत्तीसगड संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत नऊ गड्यांच्या मोबदल्यात २६८ धावा केल्या. फलंदाज आशुतोष सिंहच्या ७५ धावांच्या खेळीमुळे छत्तीसगडला अडीचशे धावांचा टप्पा गाठता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना आंध्र प्रदेशचा संघ ४६.५ षटकांत २१२ धावांवर आटोपला. छत्तीसगडकडून शशांक सिंहने तीन बळी घेतले.
दुसरीकडे, केरळच्या संघाने हैदराबादवर ६२ धावांनी मात केली. केरळने नाणेफेकीचा कौल गमावत प्रथम फलंदाजी घेतली. ५० षटकांत केरळने २२७ धावा केल्या होत्या. केरळकडून संजू सॅमसनने ३६, पोनम राहुलने ३५ आणि कर्णधार रॉबिन उथप्पाने ३३ धावा केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ ४४.४ षटकांत १६५ धावांवर आटोपला. संघाकडून तन्मय अग्रवालने सर्वाधिक ६९ धावा केल्या. तर, केरळकडून गोलंदाज के.एम आशिफने चार बळी घेतले.