मुंबई- कसोटीतील तज्ज्ञ फलंदाज समजल्या जाणाऱया चेतेश्वर पुजाराने सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी सामन्यात शतक ठोकले आहे. रेल्वे विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात झालेल्या सामन्यात पुजाराने ६१ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली. सौराष्ट्रकडून टी-ट्वेन्टी सामन्यात शतक ठोकणारा पुजारा पहिला फलंदाज ठरला आहे.
सामन्यात रेल्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पुजाराने सलामीला येत चांगली फलंदाजी केली. पुजारानेनाबाद १०० धावांची खेळी करताना १४ चौकार आणि १ षटकार खेचला. पुजाराने पहिल्या ५० धावा अवघ्या २९ चेंडूत पूर्ण केल्या. तर, दुसऱ्या ५० धावा ३२ चेंडूत केल्या. त्याला रॉबिन उथप्पाने ४६ धावा करताना चांगली साथ दिली. सौराष्ट्राने चांगली फलंदाजी करताना रेल्वेसमोर १८९ धावांचे आव्हान उभे केले.