मुंबई- भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात दिसण्याची शक्यता कमी असल्याचे, मत माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. आता गावस्कर यांच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने धोनीबाबत मोठे विधान केले आहे.
ब्रॅड हॉग सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होता. तेव्हा एका चाहत्याने, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघात धोनीचा समावेश करावा का, असा सवाल केला. यावर हॉगने, धोनीचा समावेश भारतीय संघात करू नये, असे सांगितले.
तो म्हणाला, धोनी बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता धोनीने आयपीएल स्पर्धा खेळली तरी तो पुरेसा ठरणार नाही. ऑस्ट्रेलियातील परिस्थिती आणि भारतातील स्थानिक लीग स्पर्धेतील परिस्थितीत फार फरक असेल. कारण धोनी बहुतेक सामने चेन्नईमध्ये खेळेल. चेन्नईचे मैदान फिरकी गोलंदाजीसाठी उत्तम आहे. तर ऑस्ट्रेलियातील गोलंदाजी जलदसाठी उत्तम असते. ज्या पद्धतीचे वातावरण चेन्नईत असेल तसे ऑस्ट्रेलियात मिळणार नाही.'