मुंबई -कर्नाटकचा वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनने सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत इतिहास घडवला. मिथुनने एका षटकात हॅट्रिकसह ५ विकेट्स घेत मोठ्या विक्रमाची नोंद केली. मिथुनच्या या जबरदस्त कामगिरीमुळे कर्नाटकने हरयाणावर ८ विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
हेही वाचा -इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला मिळाला ब्रिटनचा सर्वात जुना क्रीडा पुरस्कार
सामन्याच्या १९ व्या षटकातील पहिल्या चार चेंडूंवर सलग विकेट्स घेतल्या. मिथुनने अनुक्रमे हिमांशू राना(६१), राहुल तेवतिया(३२), सुमित कुमार(०) आणि अमित मिश्रा(०) यांना बाद केले. त्यानंतर त्याने पुढचा चेंडू वाईड टाकला. या वाईडनंतर षटकातील शेवटच्या चेंडूवर मिथुनने जयंत यादवला(०) बाद केले. हरयाणाने २० षटकांत ८ बाद १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना कर्नाटकने १५ षटकातच हे आव्हान पूर्ण केले. कर्नाटककडून केएल राहुलनने ६६ धावांची तर देवदत्त पड्डीकलने ८७ धावांची अर्धशतकी खेळी केली.
यंदाच्या विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत मिथुनने वाढदिवशी हॅट्ट्रिक नोंदवली होती. तर, २००९ मध्ये त्याने उत्तरप्रदेश विरुद्ध रणजी ट्रॉफी स्पर्धेत पहिल्यांदा कर्नाटककडून हॅट्रिक घेतली होती. त्यामुळे रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी या स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा मिथुन पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
तर, टी-२० क्रिकेटमध्ये एका षटकात ५ बळी घेणारा मिथुन हा दुसरा खेळाडू ठरला आहे. बांगलादेशच्या अल अमीन हुसेनने २०१३ मध्ये एका षटकात ५ बळी घेतले होते.