मुंबई - भारतीय संघ सध्या सर्वात मजबूत संघ मानला जात आहे. कारण त्यांच्याकडे एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज आहेत. त्यापैकीच दोन्ही बाजूने स्विंग करत फलंदाजाच्या मनात धडकी भरणाऱ्या भुवनेश्वर कुमारने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात छाप सोडली आहे. नकलबॉल ही त्याची खासियत आहे. भुवनेश्वर कुमार, आज त्याचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
२०१२ मध्ये क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या करणाऱ्या या वेगवान गोलंदाजाच्या आयुष्यात अनेकदा चढउतार आले. २००८-०९ मध्ये रणजीच्या अंतिम सामन्यात उत्तरप्रदेश संघाकडून मुंबई विरुद्ध हैदराबादमध्ये खेळताना सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद केल्यानंतर अचानक प्रकाश झोतात आला होता. विशेष म्हणजे सचिन स्थानिक सामन्यात पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला होता. इतकी विशेष कामगिरी करूनही भूवीच्या संघाला सामना जिंकता आला नाही.