मुंबई - भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनिवड करण्यात आली. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या नियुक्तीनंतर, शास्त्रींनी आभार मानले आहेत.
बीसीसीआयने ट्विटरवरुन शास्त्रींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. शास्त्री म्हणाले, 'मी सर्वात आधी सीएसीचे आभार मानतो. ज्यांनी माझ्यावर परत एकदा विश्वास ठेवला. संघाचा एक भाग होणे खूप अभिमानास्पद आहे.'
शास्त्री पुढे म्हणाले, 'जेव्हा तुम्ही वाईट परिस्थितीत असता तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर नाही गेले पाहिजे. संघ नेहमीच चांगले प्रदर्शन करत आहे. त्यामुळे संघाच्या चांगल्यासाठी मी टीम इंडियामध्ये मी नवनवीन प्रयोग करत राहीन.'
ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी, न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, यांच्यासह 2007 सालच्या टी-20 विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघाचे तत्कालीन व्यवस्थापक लालचंद राजपूत, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांनीही या पदासाठी अर्ज केले होते. मात्र, रवी शास्त्री यांनी मुलाखतीत बाजी मारली.