मुंबई- पाकिस्तान क्रिकेट मंडळाने काही दिवसांपूर्वी भारतासह 'बीसीसीआय'बरोबर 'पंगा' घेतला होता. यावर बीसीसीआयने आक्रमक पावित्रा घेत एक निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानची चांगलीच गोची झाली आहे.
बांगलादेशचे दिवंगत नेते शेख मुजीबुर रेहमान यांच्या जयंतीनिमीत्त, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आशिया इलेव्हन आणि विश्व इलेव्हन यांच्यात २ सामन्यांची टी-२० मालिका आयोजित केली आहे. आयसीसीने या दोन्ही टी-२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा दिलेला आहे. या सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडू सहभागी होणार होते.
मात्र, पाकिस्तानी खेळाडू या मालिकेत नसतील, तरच भारतीय खेळाडू सहभागी होतील, असा पवित्रा बीसीसीआयने घेतला आहे. यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाची पंचाईत झाली आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या सामन्यांसाठी महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार यांसारख्या खेळाडूंना पाठवण्याची विनंती केली होती. असाच प्रस्ताव बांगलादेश बोर्डाने पाकिस्तानलाही पाठवला होता.