कल्याणी ( पश्चिम बंगाल ) - भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय खेळाडूंच्या दुखापतीमुळे चिंतेत आहे. कारण, न्यूझीलंड दौऱ्यासाठी इशांत शर्मा आणि शिखर धवन अनफिट ठरले. त्याआधी भुवनेश्वर कुमार हर्नियाच्या ऑपरेशनमुळे तो क्रिकेटपासून लांब आहे. या महत्वाच्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे बीसीसीआय धस्तावली असून खेळाडूंच्या दुखापतीविषयी त्यांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे.
सद्या भारतात रणजी करंडक स्पर्धा खेळवण्यात येत आहे. बोटाच्या दुखापतीतून सावरलेला संघाचा कसोटी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याला या स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. पण बीसीसीआयने त्याला रणजी करंडक खेळण्यापासून रोखले आहे.
दरम्यान, साहा स्थानिक सामन्यात खेळताना दुखापतग्रस्त होऊ नये, यासाठी ही खबरदारी बीसीसीआयने घेतली असल्याचे बोलले जात आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ २ कसोटी सामने खेळणार आहे. साहा सध्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) आहेत.
बंगालचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी हैदराबादविरुद्ध डाव आणि 303 धावांनी विजय मिळविल्यानंतर सांगितले की, दिल्लीविरुद्ध रविवारीपासून ईडन गार्डन्सवर सामन्यासाठी साहा उपलब्ध होणार नाही. बोर्डाने त्यांना खेळण्यास मनाई केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बीसीसीआयने याआधी जसप्रीत बुमराहला दुखापतीच्या कारणाने, रणजी खेळण्यापासून रोखलं आहे.