कोलकाता - भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते आसुसलेले असतात. या दोन संघामध्ये पुढील काळात द्विपक्षीय क्रिकेट मालिकेबाबत, लवकरच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणाऱ्या भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलीला प्रश्न विचारण्यात आला.
तेव्हा गांगुलीने सांगितले की, 'भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिकेबाबतचा निर्णय भारत सरकारच्या परवानगीचा विषय आहे. हा निर्णय केवळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेच घेऊ शकतात.'
त्यामुळे हा प्रश्न तुम्ही भारताच्या किंवा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना विचारायला पाहिजे. द्विपक्षीय मालिकेसाठी नक्कीच आम्हाला परवानगी घ्यावी लागेल, कारण कोणत्याही आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी सरकारच्या परवानगीची गरज असते. त्यामुळे आमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाही. असे गांगुलीने सांगितले.
सौरव गांगुली २३ ऑक्टोबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी गांगुलीचा बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा ईडन गार्डनच्या मैदानावर असलेल्या सीएबीच्या मुख्यालयात रंगला होता. यावेळी पत्रकारांशी गांगुलीने संवाद साधला.
दरम्यान, अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि ब्रिजेश पटेल यांच्या नावांची चर्चा रंगली होती. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (सोमवार) केवळ सौरव गांगुली यानेच नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे आता गांगुलीचीच नियुक्ती अध्यक्षपदी होणार हे जवळपास निश्चित आहे. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सभेत अध्यक्षपद आणि इतर जागांसाठी अंतिम घोषणा होईल.
हेही वाचा -सॅल्युट विरू तुझ्या कामाला..! पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांच्या मुलांना शिकवतोय क्रिकेट
हेही वाचा -धोनीच्या निवृत्तीबद्दल सौरव गांगुली म्हणाला...