मुंबई - आयपीएलचा तेरावा हंगाम संपून २४ तासही उलटले नाहीत. तर बीसीसीआयने चौदाव्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याविषयी सांगितले की, आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन भारतात केले जाईल. याशिवाय एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार चौदाव्या हंगामात ९ संघ सहभागी होणार आहेत.
एका मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय पुढीलवर्षी होणाऱ्या आयपीएल हंगामाच्या लिलावाबाबत विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय आगामी हंगामात ९ संघ सहभागी करण्याची योजना आखत आहे. कोरोनामुळे झालेली आर्थिक तूट भरून काढणे, यामागचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.
याआधी आयपीएलमध्ये नऊ आणि एका हंगामात दहा संघांनी सहभाग नोंदवला होता. २०११ च्या हंगामात दहा संघ तर २०१२ मध्ये ९ संघांनी सहभाग नोंदवला होता. माध्यमाच्या वृत्तानुसार नववा संंघ गुजरात, अहमदाबाद असू शकतो.