मुंबई -टीम इंडियाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठेच्या 'पॉली उम्रीगर' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बीसीसीआयने निवडलेल्या वर्षभरातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला हा पुरस्कार दिला जातो. तर महिलांमध्ये पूनम यादव हिला सर्वोत्तम महिला क्रिकेटरचा सन्मान मिळाला आहे.
हेही वाचा -पुजाराने ठोकले ५०वे शतक!.. दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
२०१८-१९ या वर्षासाठी बीसीसीआयने ट्विटरवरून या पुरस्कारांची घोषणा केली. जानेवारी २०१८ मध्ये बुमराहने आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत पदार्पण केले. आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि विंडीजविरूद्ध बळींचे पंचक मिळवणा बुमराह हा आशियातील एकमेव गोलंदाज आहे. शिवाय, २०१८-१९ मध्ये कसोटीत सर्वाधिक बळी घेतल्याबद्दल दिलीप सरदेसाई पुरस्कारानेदेखील बुमराहचा सत्कार करण्यात येणार आहे. तर, महिलांमध्ये अर्जुन पुरस्कार विजेती पूनम यादवला सर्वोत्तम महिला क्रिकेटरचा सन्मान मिळाला आहे.
भारताचे माजी कर्णधार कृष्णामचारी श्रीकांत आणि अंजुम चोप्रा यांना अनुक्रमे कर्नल सी.के. नायडू लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार आणि महिलांसाठी बीसीसीआय लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात येणार आहे.