नवी दिल्ली - बांगलादेश क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दोन वर्षांची बंदी घातली आहे. त्याने तीन आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले असून त्यानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला. एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी क्रिकेट अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
जानेवारी २०१८ मध्ये तिरंगी मालिकेदरम्यान (बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वे ) शाकिबला मॅच फिक्सिंगची ऑफर एका बुकीकडून मिळाली होती. याची माहिती त्याने आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली नाही.
याशिवाय त्याला २०१८ मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यातही फिक्सिंगची ऑफर होती. याचीही माहिती त्याने आयसीसीला दिली नाही. त्यामुळे शाकिबवर ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीने ट्विट करत शाकिबवर बंदीची घोषणा केली.