बंगळुरु - चिन्नास्वामी स्टेडियम येथे सुरू असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरूच्या संघापुढे १८८ धावांचे आव्हान दिले आहे. बंगळुरूच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने मुंबईने २० षटकात ८ बाद १८७ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सचा संघ युझवेंद्र चहलच्या फिरकी जाळ्यात अडकला. त्याने ३८ धावा देत महत्वपूर्ण ४ बळी घेतले.
विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सलामी जोडी रोहित-डी कॉक यांनी बंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्ला केला. त्यांनी ५४ धावांची सलामी दिली. रोहित शर्माने ३३ चेंडूत ४८ धावा केल्या. त्याचे अर्धशतक २ धावांनी हुकले. त्यात १ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. डी कॉकने २० चेंडूत २३ तर युवराज सिंगने १२ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले.