मेलबर्न - भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघामध्ये तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ नव्या जर्सीत दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने नव्या जर्सीच अनावरण केले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नव्या जर्सीबाबत ट्विटरवरून माहिती दिली. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आज या जर्सीचे अनावरण केले आहे. देशाच्या विकासातऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांचे महत्त्वाचे योगदान आहे. या योगदानासाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी विशेष जर्सीचे डिझाईन करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत ही स्पेशल जर्सी परिधान करणार आहे.
काय खास आहे नव्या जर्सीत...
ऑस्ट्रेलियाच्या नव्या जर्सीची डिझाईन अॅसिक्स, टी फिओना क्लार्क आणि कोर्टनी हॉगेन यांनी केले आहे. टी फिओना क्लार्क या दिवंगत क्रिकेटपटू मस्किटो कुसेन्स यांचे वशंज आहेत. ही जर्सी मूळ, विद्यमान आणि भविष्यातील स्वदेशी खेळाडूंना समर्पित आहे, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली.
मी नवी जर्सी घालून खेळण्यासाठी उत्साहित असल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलिचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने दिली. याआधी ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अशी जर्सी परिधान केली होती.
असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा –
- पहिला एकदिवसीय सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
- दुसरा एकदिवसीय सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
- तिसरा एकदिवसीय सामना – १ डिसेंबर – ओव्हल
- पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – ओव्हल
- दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
- तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी
- पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अॅडलेड (दिवस-रात्र)
- दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
- तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी – सिडनी
- चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गाबा