नवी दिल्ली - श्रीलंकेचा महिला संघ आणि ऑस्ट्रेलियाचा महिला संघ यांच्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-२० लढतीमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. या लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाची खेळाडू बेथ मूनी हिने ६१ चेंडूत ११३ धावांची खेळी केली. तिने खेळीदरम्यान तब्बल २० चौकार लगावले. एकाच डावामध्ये सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रम तिच्या नावावर जमा झाला आहे.
दरम्यान, या लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बेथ मूनी हिच्या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने निर्धारीत २० षटकांमध्ये ४ बाद २१७ धावांचा डोंगर उभारला. यात मूनीचा वाटा ११३ धावांचा होता. मूनीने या खेळीदरम्यान, एकही षटकार लगावला नाही, मात्र चौकारांचा पाऊस पाडला.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला ७ बाद १७६ धावा करता आल्या. श्रीलंकेची कर्णधार सी. अट्टापटूटू हिनेही ११३ धावांची शतकी खेळी केली. परंतु ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. ऑस्ट्रेलियाने हा सामना ४१ जिंकत तीन लढतीच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.