मुंबई - सिडनी कसोटीत भारतीय संघ दबावात असताना ऋषभ पंतने सुरूवातीला सावध खेळ केला. जम बसल्यानंतर त्याने येथेच्छ फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना बेजार केले. त्याने १२ चौकार आणि ३ षटकारांची आतिषबाजी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. पंतच्या या खेळीचे सर्त्र कौतुक होत असून अनेक दिग्गजांनी त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत भारतीय संघासमोर ४०७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात दमदार प्रत्युत्तर दिले. भारताकडून ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा जोडीने चौथ्या गड्यासाठी शतकी भागिदारी केली. यात पंतने तडाखेबाज खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण पंत बाद झाल्यानंतर पुजारादेखील त्रिफळाचीत झाला.